May 25, 2026

भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी कसबा गणपती चरणी प्रार्थना; तरुणांनी खचून जाऊ नये : शिवसेना नेत्या, आ. डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे.दि.१७: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडून आल्यानंतर शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पुण्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेत धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला अभिवादन केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्री दत्त मंदिर या सर्व ठिकाणी त्यांनी विधिवत पूजा व आरती करत दर्शन घेतले.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आज समाजात विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे काटकसरीने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. याच भूमिकेतून मर्यादित स्वरूपात कार्यकर्त्यांसोबतचा आजचा दौरा आयोजित करण्यात आला.”

त्या पुढे म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “गोरगरिब आणि सामान्य कुटुंबांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहिला पाहिजे. शासनाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना अधिकाधिक योजनांचा लाभ मिळावा, त्यांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

नीटसारख्या परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना त्यांनी चिंता व्यक्त केली. “पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

“मी कसबा गणपती चरणी प्रार्थना केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारला भ्रष्टाचारमुक्त शासन करण्याची शक्ती मिळो. सामान्य लोकांच्या प्रश्नांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा व्हावा,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तरुणांना आवाहन करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “काही अडचणी आल्या असतील तरी त्यातून मार्ग नक्की निघेल. तरुणांनी खचून जाऊ नये. सर्व परीक्षांबाबत सरकार योग्य ती कारवाई करेल, असा मला विश्वास आहे.”

यावेळी, प्रकाश ढमढेरे शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख, आनंद गोयल शहर संघटक, राजाभाऊ भिलारे पुणे शहर समन्वयक, हेमंत बत्ते वडगाव शेरी विधानसभा प्रमुख, संदीप शिंदे पुणे शहर सचिव, राजू विटकर झोपडपट्टी शहर प्रमुख, महेंद्र जोशी, राहुल खैरे, सुधीर कुरुमकर, निलेश घारे, कांताताई पांढरे संपर्क प्रमुख बारामती, अनिता परदेशी विधानसभा क्षेत्र प्रमुख वडगाव शेरी, भारती महेंद्र जोशी शिवसेना उपशहर प्रमुख पर्वती मतदारसंघ, अनिता शिंदे स्त्री आधार केंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button