पुणे प्रतिनिधी:09 मे.
प्रसंगी घरादाराकडे दुर्लक्ष करून समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना खंबीर पाठिंबा देण्याचे कार्य त्यांच्या माता करीत असतात. त्या कार्यकर्त्यांना पदराखाली घेतात म्हणून कार्यकर्ता आपल्या संपूर्ण परिसरावर मायेचा आणि कार्याचा पदर पांघरू शकतो, असे प्रतिपादन आमदार हेमंत रासने यांनी केले.
जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून जय गणेश व्यासपीठाच्या वतीने विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेल्या त्यांच्या मातांचा गौरव करण्यात आला.
आमदार रासने यांच्यासह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते प्रसाद, महावस्त्र, सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन मातांचा गौरव करण्यात आला. यावेळी युवराज निंबाळकर, उदय जगताप , शिरीष मोहिते ,विवेक खटावकर व राजा कदम मान्यवर उपस्थित होते, जय गणेश व्यासपीठ मधील पाच मंडळांचा सहभाग होता अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर , शनिवार पेठ येथील ओम हरिवेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव, गुरुवार पेठ येथील वीर शिवराज मित्र मंडळाचे किरण सोनीवाल, बुधवार पेठ येथील साईनाथ मंडळ ट्रस्ट पियूष शहा, श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद भाऊ थोरात यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकांचे संघटन करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्योत्तर काळात विकासाची फळे समाजाच्या तळागाळापर्यंत नेऊन सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून केला जातो. कार्यकर्ता हा या मंडळांचा कणा आहे आणि आपल्या मुलांचे संसार सांभाळून त्यांना समाजकार्यासाठी मोकळीक देणाऱ्या माता या निश्चितपणे वंदनीय आहेत. गौरवाला पात्र आहेत, असे रासने यांनी नमूद केले.
समाजाचे आणि देशाचे भवितव्य घडवणारी सुसंस्कृत नवी पिढी घडवणे हे देखील एक मोठे सामाजिक कार्य आणि करियर आहे, असे मत ह भ प चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. सध्याच्या काळात नव्या पिढीतील अनेक जण न्यूनगंडाने ग्रस्त असून त्यांना लग्न करण्यात अथवा मुले जन्माला घालण्यात रस असत नाही. प्रत्यक्षात समाज घडवण्यासाठी सुसंस्कृत निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
मातृत्व हा स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार असून तो नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे मत डॉ. आरती दातार यांनी यावेळी व्यक्त केली. ज्या समाजात महिलांबद्दल आदरभाव कायम असतो तोच समाज प्रगतीला पात्र असतो. महिलांचा अवमान करणारा समाज रसातळाला पोहोचतो, या स्वामी विवेकानंद यांच्या वचनाची आठवण त्यांनी करून दिली. मातृभक्ती हा परमार्थाचा पाया आहे. केवळ एक दिवस प्रतीकात्मक रित्या मातेबद्दल आदरभाव व्यक्त करणे पुरेसे नाही. आपल्या मातेबद्दल सतत आजाराची आणि प्रेमाची भावना बाळगणे ही समृद्ध भारतीय परंपरा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मातृ गौरव सन्मानाने चंद्रभागा पांडुरंग पळसकर, विद्या विद्याधर जाधव, मंजिरी सुभाष भगत, संगीता मारुती दिघे, शारदा संजय हराळे, सुरेखा भगवान जाधव, गायत्री सूर्यकुमार निरगुडकर, लक्ष्मी प्रल्हाद ढेकळे, नलिनी रतन सपकाळ, अनिता चंद्रकांत पोटे, सुलभा दत्तात्रय आदमुलवार, दिपाली राजेश भुजबळ, सुमन अरुण पायगुडे, पुष्पावती निंबाळकर यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पियुष शहा यांनी केले. त्यांनी यावेळी सत्कारार्थी मातांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात समीक्षा मुकादम यांनी स्वागत पर गणेश वंदना सादर केली तर जागृती यंदे या चिमुकलीने आईवर भावनात्मक कविता सादर केली. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले.

