भागीरथी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
हडपसर, पुणे – “आपला विश्वास हाच भागीरथी पतसंस्थेचा श्वास” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या भागीरथी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा रविवारी (दि. १४ सप्टेंबर २०२५) स्वानंद हॉल, डीपी रोड, हँडबॉल स्टेडियम समोर, हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
गेल्या पंचवीस वर्षांपासून विश्वास व प्रामाणिकतेने कार्यरत असलेल्या संस्थेची सभासद संख्या १६३२ वर पोहोचली आहे. संस्थेकडे ६ कोटी ४४ लाख ६२ हजार ०९१ रुपये ठेवी असून, कर्जे ६ कोटी ४७ लाख ३९ हजार ३७४ रुपये बाकी आहेत. या वर्षी संस्थेला ९२ लाख ९० हजार ६४१ रुपये उत्पन्न व ४१ लाख ८३ हजार ८०३ रुपये नफा झाला आहे. यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक सभासदाला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शिवाजी डोंबे तर उपाध्यक्ष पोपट पाटील, संस्थापक संचालक प्रदीपशेठ गोगावले, विनोद अष्टुळ, वामन जाधव, सरोजिनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संचालक विनोद अष्टुळ यांची सहकार भारती जिल्हाप्रकोष्ठ सहप्रमुखपदी निवड, संचालिका गायत्री कामथे यांना पुणे मनपा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच दहावी-बारावी व इतर क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भापकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष पोपट पाटील यांनी केले


