March 23, 2026

उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांचा आढावा; रुग्णालयांना तात्काळ प्रत्यक्ष भेट

पुणे  : शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने  उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस अति. आयुक्त  पवनीत कौर, आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोऱाडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणेश बागडे तसेच विद्युत व भवन विभागाचे अभियंते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध महापालिका रुग्णालयांमधील प्रलंबित कामे, सेवा विस्तार, आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय हे संपूर्णपणे महापालिकेमार्फत चालवून अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कै. द्रोपदाबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालय येथे डोळे व दंत उपचार सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

औंध रोडवरील कै. बाबुराव गेनबा शेवाळे रुग्णालय या इमारतीचा संपूर्ण उपयोग करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती करत आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले. तसेच औंध कुटी रुग्णालय येथे नूतनीकरण करून पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले.

गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीनंतर  उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी संबंधित विभागांना सर्व बाबींवर प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच दुपारी १.३० ते ३ या वेळेत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वरील सर्व रुग्णालयांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन सुधारणा कामांना त्वरित प्रारंभ करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button