March 23, 2026

श्रीकृष्ण नीती आजही समाजासाठी गरजेची आणि दिशादर्शक – मयूर भावे

पुणे  – कृष्ण नीती म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेले विचार नाहीत तर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजेच कृष्ण नेते आहे. त्यासाठी श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णाचे सर्व गुण आपल्यामध्ये येणे शक्य नाही परंतु त्या पैकी एखादा गुण आपण आत्मसात करू शकतो श्रीकृष्ण विचार हे आजही समाजासाठी गरजेचे आणि दिशादर्शक आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत मयूर भावे यांनी व्यक्त केले.

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गरज कृष्ण नीतीची या विषयावरील व्याख्यानमालेत मयूर भावे बोलत होते. संस्थेचे वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे, विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवे आदि यावेळी उपस्थित होते.

मयूर भावे म्हणाले, आजच्या काळामध्ये असलेला हिंसेचा अर्थ हा श्रीकृष्णाचा विचार नाही. श्रीकृष्णाचा हिंसेचा विचारवेगळा आहे. समाजाच्या हितासाठी आवश्यक असणारी हिंसा ही हिंसा ठरत नाही तर तो पराक्रम ठरतो हेच आपण महाभारतातून शकतो. आजच्या काळामध्ये अहिंसेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे परंतु श्रीकृष्णाचे जो पराक्रमाचा विचार आणि शिकवण आहे ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
भूतकाळाचे विस्मरण होऊ न देता आणि भविष्याचा वेध मनामध्ये ठेवून वर्तमान काळ आपल्या हातातून निसटू न देणे म्हणजेच श्रीकृष्ण नीती आहे. श्रीकृष्ण नीती ही कृतीपेक्षा उद्देशाला महत्त्व देते. त्यामुळे आपला उद्देश हा कायम चांगला आणि देशाप्रती योग्य ठेवला पाहिजे. श्रीकृष्ण नीती आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अंगीकारून आपण सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून देशासाठी काय करू शकतो याचा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. हा विचार जर प्रत्येक तरुणाने आयुष्यामध्ये अंगीकारला तर भारत निश्चितच एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकेल असेही मयूर भावे यांनी यावेळी सांगितले.
अमेय सप्रे म्हणाले, व्याख्यानमालेच्या निमित्ताने राष्ट्र प्रथम हा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भक्ती शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून प्राचीन मंदिरांचा इतिहास समाजासमोर यावा यासाठी आम्ही कार्य करीत आहोत, तसेच बेटिंग अँप वर बंदी घालून आजच्या तरुणांचे भविष्य सुरक्षित करावे यासाठीही संस्थेने पुढाकार घेतला आहे.
भारतीय संस्कृती ही श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारधारेवर उभी आहे. श्रीराम हे आदर्शवादी आहेत तर श्रीकृष्ण हे वास्तववादी आणि व्यवहारावादी आहेत. या दोन्हींचा विचार देशासाठी गरजेचा आहे. देश खऱ्या अर्थाने एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयास यायचे असेल तर या दोन्ही विचारधारा आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. नागरिक सोशल फाउंडेशन अशा प्रकारे प्रयत्न करत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे अशी प्रशंसा मयूर भावे यांनी यावेळी केली.
सायली गोडबोले जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पुष्कर सप्रे यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button