महिला दिनानिमित्त दिशाज्योत फाउंडेशनचा उपक्रम : वस्तीतील महिला कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन कार्याचा गौरव
मुंबई दिनांक 06 मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दिशाज्योत फाउंडेशनच्या वतीने वस्ती स्तरावर काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या प्रमुख महिला कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आजूबाजूच्या कुटुंबीय व शेजाऱ्यांना एकत्रित करून त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या विशेष प्रशंसा बैठका घेतल्या जात आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून फाउंडेशनचे पदाधिकारी विविध वस्त्यांमध्ये भेट देत आहेत. या बैठकींमध्ये महिला कार्यकर्त्यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून वस्तीमध्ये राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला जात आहे. तसेच त्यांच्या कामामुळे परिसरातील महिलांमध्ये जागरूकता आणि एकजूट कशी वाढली याची माहितीही उपस्थितांना देण्यात येत आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे वस्ती पातळीवर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची त्यांच्या कुटुंबीय आणि समाजासमोर योग्य दखल घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. बैठकीदरम्यान उपस्थितांकडूनही या महिला कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, महिला दिनाच्या दिवशी या प्रमुख महिला कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिशाज्योत फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वस्तीतील महिलांमध्ये सामाजिक कार्यासाठी अधिक प्रेरणा निर्माण होत असल्याचेही सांगण्यात आले.
