March 23, 2026

उपमहापौर परशुराम वाडेकर यांना ‘दि ग्रेट फकीरा’ पुरस्कार प्रदान

पुणे : महाराष्ट्र लहुजी आर्मी व दयाशांती फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘दि ग्रेट फकीरा’ पुरस्कार पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना प्रदान करण्यात आला. अॅड. महेश सकट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विशाल सकट व बापू खोडे उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ‘फकीरा’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली होती. या कादंबरीत बाबासाहेबांबद्दल लिहिलेले “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले माझे भिमराव” हे गीत आजही अजरामर आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला असून या पुस्तकाची विक्री लाखोंच्या घरात झाली आहे.

ही कादंबरी दलित, आदिवासी, गोरगरीब तसेच भटके-विमुक्त समाजाच्या जीवनावर आधारित असून ब्रिटिश सत्तेविरोधात दलितांच्या वेदना मांडणारे क्रांतिकारी साहित्य आहे. या कादंबरीतील ‘फकीरा’ या नायकाप्रमाणेच समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. तसेच या नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

कार्यक्रमादरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यूपीएससी-एमपीएससी अभ्यासक्रमाची पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित रणदिवे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button