March 23, 2026

शैक्षणिक संशोधन औद्योगिक तंत्रज्ञानात बदलण्याची गरज – डॉ. दत्तात्रय जाधव

पुणे : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, उरळी देवाची (पुणे) येथे “INMEC-2026” (Interdisciplinary Advances in Mechanical, Electronics and Computer Engineering) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे १४ व १५ मार्च रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील ग्लोबमाईंड टेक्नॉलॉजी तसेच विज्ञान-तंत्रज्ञान प्रकाशन क्षेत्रातील अग्रगण्य साईटेक प्रेस व स्प्रिन्जर नेचर यांच्या संयुक्त भागीदारीत ही परिषद पार पडली.

परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सॅमसन टेकनीनिशे लॅब्सचे मुख्य डेटा सायंटिस्ट डॉ. प्रदीप बिलूलकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र रत्न आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ अब्दुल्ला पठाण हे मुख्य वक्ते म्हणून लाभले.

यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, प्राध्यापकांनी शैक्षणिक संशोधन औद्योगिक तंत्रज्ञानात रूपांतरित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. संशोधनाचे प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात रूपांतर झाल्यास देशाच्या तांत्रिक प्रगतीला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही त्यांनी दिली.

डॉ. प्रदीप बिलूलकर यांनी उपस्थितांना संशोधनाचा पंचसूत्री कार्यक्रम समजावून सांगत संशोधनातील गुणवत्ता आणि नावीन्याचे महत्त्व अधोरेखित केले.

उद्घाटन समारंभाला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषद ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही माध्यमांत आयोजित करण्यात आली होती. देश-विदेशातून ६०० हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले असून त्यापैकी १९७ निवडक शोधनिबंधांचे विविध तांत्रिक सत्रांमध्ये सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अर्चना काळे यांनी स्वागतपर भाषण केले. परिषदेचे Convener डॉ. परीक्षित महाले यांनी आपल्या भाषणात देश-विदेशातील नवीन तांत्रिक संकल्पना आणि संशोधनाची वाढती गरज यावर प्रकाश टाकला, तर डॉ. तुषार भोईटे यांनी परिषदेच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली.

ही परिषद संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ. संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. परिषदेच्या आयोजनासाठी ग्लोबमाईंडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बाळाजी बोडखे, संगणक विभागप्रमुख प्रा. सागर राजेभोसले आणि डॉ. वीणा कदम यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्रा. सोमण यांनी आयोजक व सहभागी संशोधकांना शुभेच्छा देत अशा प्रकारच्या व्यासपीठासाठी संस्था कायम कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सागर राजेभोसले यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button