भाजपकडून पूर्ण मान-सन्मान मिळतोय; नाराजीच्या बातम्या गैरसमजावर आधारित – उपमहापौर वाडेकर
पुणे: प्रतिनिधी
पुणे महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आपल्या नाराजीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचे खंडन करत स्पष्ट केले की, अशा बातम्या पूर्णपणे गैरसमजातून पसरल्या आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हे मित्रपक्ष असून आपल्याला पदाबरोबरच योग्य तो मान-सन्मान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
काही माध्यमांमध्ये उपमहापौरांना महापालिकेच्या कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नसल्याने ते नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विशेषतः त्यांच्या प्रभागात झालेल्या महापौर चषक स्पर्धेला त्यांना निमंत्रण नव्हते, असेही नमूद करण्यात आले होते. मात्र, हा प्रकार तांत्रिक त्रुटीमुळे घडल्याचे वाडेकर यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. पक्षाच्या योगदानाची दखल घेत भाजपने आपल्याला उपमहापौर पद दिले असून त्यासोबत सन्मानही दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नाराजीचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

भाजप आणि रिपब्लिकन पक्ष हे दीर्घकालीन मित्रपक्ष असून ते केवळ सत्ता किंवा पदासाठी एकत्र आलेले नाहीत. वैयक्तिक मान-सन्मानाच्या मुद्द्यावरून या पक्षांमध्ये मतभेद होणे अशक्य असल्याचेही वाडेकर यांनी अधोरेखित केले.
तसेच, आपण कोणतीही बैठक किंवा पत्रकार परिषद घेतलेली नसतानाही अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे सांगत त्यांनी त्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले.
