May 10, 2026

पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे संस्थेच्या कार्याला कौतुक

पुणे, विद्यानगर : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना बालवयातच संविधानाची जाणीव करून देणाऱ्या संस्था देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहेत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री Ramdas Athawale यांनी व्यक्त केले.

चलवादी शिक्षण संस्थेच्या ‘पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’च्या नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (ता.४) मा. आठवले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या वेळी त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य प्रवेशद्वारावर फटाक्यांच्या आतषबाजी आणि विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध स्वागताने झाली. पाच सुवासिनींनी औक्षण करून, पुष्पगुच्छ व बॅच देत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर फीत कापून नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यानगर येथे ‘पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’च्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री Ramdas Athawale यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून शाळेची संस्कृती संवर्धनाची बांधिलकी दिसून आली. गणेश वंदना, ‘मी जिजाई बोलते’ हे एकपात्री सादरीकरण, तसेच शिक्षकांनी सादर केलेले गीत यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

या प्रसंगी चेअरमन हुलगेश चलवादी यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष ॲड. रेणुका चलवादी व स्वप्नील शिर्के यांच्या उपस्थितीत मा. आठवले यांचा शाल, पगडी, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात इमारतीचे आर्किटेक्चरल काम करणारे आर्किटेक्ट सोमनाथ केरूर व सदाशिव कुलकर्णी यांनाही गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उल्हास औटी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या स्मिता लोंढे यांनी केले.

हा उद्घाटन सोहळा शाळेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरला असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरल्याची भावना संस्थाचालकांनी व्यक्त केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button