रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. हुलगेश चलवादी यांची RPI प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
पुणे, दि. ४ एप्रिल २०२६ — रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बहुजन नेते व पुण्याचे माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
पुण्यातील ‘रेसिडेन्सी क्लब’ येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश वर्किंग कमिटी बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या वेळी राज्यातील जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांशी चर्चा करून रामदास आठवले यांनी डॉ. चलवादी यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली.
डॉ. चलवादी यांना तीन दशकांहून अधिक सामाजिक व राजकीय कार्याचा अनुभव असून, संघटन कौशल्य, लोकसंपर्क आणि बहुजन चळवळीतील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी नुकतेच २४ मार्च २०२६ रोजी RPI (आ) पक्षात प्रवेश केला होता.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. चलवादी यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासोबतच राज्यभर पक्ष विस्तारावर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच वंचित, पीडित, शोषित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महासचिव गौतम सोनावणे, महिला अध्यक्ष चंद्रकला सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व पुणे व पिंपरी-चिंचवडमधील आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
