प्रशांत वाघमारे यांच्यावरील आरोप निराधार; समर्थकांचे आयुक्तांना निवेदन, सर्वोच्च न्यायालयात अपीलची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावरील आरोप पूर्णपणे चुकीचे व निराधार असल्याचा दावा करत विविध मान्यवरांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि काही वृत्तांमधून प्रशांत वाघमारे यांच्या संदर्भात पसरवली जाणारी माहिती दिशाभूल करणारी असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. वाघमारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून शहराच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या भेटीदरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, ॲड. मोहन वाडेकर तसेच माजी नगरसेवक जयदेव रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.
चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने स्पष्ट भूमिका मांडत, “हा प्रकार एका प्रामाणिक अधिकाऱ्याचे चारित्र्यहनन करण्यासाठी रचला गेला आहे. आम्ही सर्वजण प्रशांत वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे सांगितले. तसेच प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता या प्रकरणाचा कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालयात लढावा, अशी मागणी करण्यात आली.
महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असून, या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या घडामोडींमुळे प्रशांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ पुण्यातील राजकीय व सामाजिक स्तरावर पाठिंबा वाढताना दिसत आहे.
