May 10, 2026

पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी; नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठक संपन्न

पुणे | प्रतिनिधी
बाणेर–पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसर वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आज औंध क्षेत्रीय कार्यालय येथे संयुक्त समन्वय बैठक पार पडली.

या बैठकीस औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन कोटे, माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिक, तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आदी मुद्द्यांवर सर्वंकष आढावा घेण्यात आला. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

  • या आठवड्यात महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग आणि पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह परिसराचा संयुक्त पाहणी दौरा केला जाईल.
  • पाहणी अहवालाच्या आधारे सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल.
  • हा आराखडा एप्रिल आखेर सर्व संबंधितांसमोर सादर केला जाईल.

– त्यानंतर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीसाठी कार्ययोजना निश्चित केली जाईल.

यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले की, “समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा, आधीच नियोजन करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने पुर्वनियोजनात पावले उचलली पाहिजेत. पासपोर्ट सेवा केंद्र ही नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा आहे; मात्र त्याचा परिसरातील वाहतूक व नागरी व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button