विश्रांतवाडीतील वाहतूक कोंडीला दिलासा! साठे बिस्कीट ते डेक्कन कॉलेज चौक दरम्यान बीआरटी मार्ग हटविण्याची हालचाल वेगात
पुणे:विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड घडत असून साठे बिस्कीट ते चंद्रमा हॉटेल, डेक्कन कॉलेज चौक या दरम्यानचा बीआरटी मार्ग हटविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माजी आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांच्या सूचनेनुसार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

ही पाहणी पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या बीआरटी मार्ग हटविण्याच्या ठरावाच्या अनुषंगाने पार पडली. या प्रस्तावित कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः विश्रांतवाडी व आसपासच्या भागातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या पाहणीवेळी स्थायी समिती सदस्य व प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सुहास टिंगरे, अधीक्षक अभियंता (पथ) आशिष जाधव, कार्यकारी अभियंता (पथ) संजय धाराव, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) संदीप पाटील, उपअभियंता पौर्णिमा गायकवाड तसेच विशाल भोसले व अक्षय मोडवे उपस्थित होते.

नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला गती देणारा आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवा दिलासा देणारा हा निर्णय लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
