May 10, 2026

हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम

पुणे | प्रतिनिधी :
शहरातील हौशी गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘पुणे आयडॉल २०२६’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मे (सोमवार) ते १० मे (रविवार) २०२६ या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली.

यावेळी सोमेश्वर फाउंडेशन चे विश्वस्त बिपीन मोदी,जितेंद्र भुरुक,उमेश वाघ,अमित मुरकुटे,महेंद्र पवार,गणेश शेलार,संजय माझिरे,संजय तरडे,प्रमोद कांबळे उपस्थित होते.

ही स्पर्धा स्व. विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून साकारलेली असून, केवळ एक ‘व्यासपीठ’ न राहता गायक कलाकारांसाठीचे एक मानाचे व्यासपीठ म्हणून ती उभारण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित गायकांना मोठी संधी मिळाली आहे. संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून सहभागी होत असल्याने स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.

स्पर्धा चार वयोगटांत आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये लिटिल चॅम्प्स (१५ वर्षांपर्यंत), युवा आयडॉल (१६ ते २५ वर्षे), जनरल आयडॉल (२६ ते ५८ वर्षे) आणि ओल्ड इज गोल्ड (५८ वर्षांवरील) या गटांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गायकांनाही सहभागाची संधी देण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून ‘पुणे आयडॉल ’ हा सन्मानचिन्ह ही प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट स्पर्धकांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येतील.

याशिवाय, आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना गायनाची आवड जोपासणाऱ्या पाच निवडक व्यक्तींना दरवर्षीप्रमाणे ‘व्हॉईस ऑफ चॉईस – पुणे आयडॉल ’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ गायक उपेंद्रजी भट यांच्या शुभहस्ते ४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृहात होणार असून, अंतिम फेरी १० मे (रविवार) रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे रंगणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ मे २०२६ आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button