May 10, 2026

उपवर्गीकरणाच्या न्यायासाठी मातंग समाज एकवटला; आमदार अमित गोरखे यांच्याशी पदाधिकाऱ्यांची भेट

पुणे, दिनांक 24 एप्रिल

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील अ, ब, क, ड उपवर्गीकरण आणि ५९ जातींच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला नवे बळ मिळताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मातंग समाजाचे नेते व आमदार अमित गोरखे यांची पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली.

या बैठकीत ज्येष्ठ नेते शंकर भाऊ तडाखे आणि सचिव दीपकभाऊ कसबे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. “उपवर्गीकरणाच्या लढ्यात आम्ही एकजूट आहोत. हा लढा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून न्याय आणि समानतेसाठी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात मातंग समाजातील कार्यकर्ते सातत्याने सक्रिय आहेत. मात्र, या लढ्याला व्यापक यश मिळवण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

समाजातील भेदभाव दूर करून समतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. “एकमेकांच्या हक्कांसाठी उभे राहिलो, तरच खरी सामाजिक एकता निर्माण होईल,” असा संदेश पदाधिकाऱ्यांनी दिला.

न्याय आणि समानतेसाठी सुरू असलेल्या या लढ्याला आता सर्व स्तरांतून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button