May 12, 2026

पुण्यात महिला अत्याचारांविरोधात ‘आप’चा एल्गार; कलाकार कट्ट्यावर जोरदार निदर्शने

पुणे प्रतिनिधी: दिनांक 11 मे
पुण्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ तसेच नसरापूर आणि पर्वती-जनता वसाहत येथील पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज आम आदमी पार्टीतर्फे कलाकार कट्टा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

गेल्या काही दिवसांत पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अहवालानुसार महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार महाराष्ट्रात दररोज सरासरी आठ बलात्काराच्या घटना घडत असून, महिला अत्याचाराची तब्बल ७८ हजार ७२६ प्रकरणे तपासासाठी प्रलंबित आहेत. तसेच न्यायालयांमध्ये सुमारे ३ लाख २९ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारवर टीका करताना केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, तर महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. कायद्याची कठोर अंमलबजावणी, जलदगती न्यायप्रक्रिया आणि दोषींना त्वरित शिक्षा झाल्यास गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असे मत व्यक्त करण्यात आले. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी शाळा, पालक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून पोलिसांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या आंदोलनात आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती करंजावणे, सुरेखा भोसले, माधुरी गायकवाड, शितल कांडेलकर, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button