साने संगीत लोककला मंच, ऊरूळी कांचन यांना राज्यस्तरीय ‘संगीत रत्न पुरस्कार’ प्रदान
पुणे, ऊरूळी कांचन : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ व पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी विद्यालय, रविंद्र कला मंदिर, ऊरूळी कांचन येथे आठवे कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा 2026 उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, अभिनेते व सुप्रसिद्ध कवी श्री. सिताराम नरके यांनी भूषविले. दीपप्रज्वलन व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान (बापू) कांचन, विश्वस्त महादेव कांचन, राजाराम कांचन, ज्येष्ठ साहित्यिक सुर्यकांत नामुगडे सर, शिक्षण व क्रीडा जि.प. पुणे सदस्या सुरेखा हरगुडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य भरत भोसले, कवी-संगीतकार सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात साने संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी अभंग, गवळण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच मराठी व हिंदी गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संस्कृती अंधारे, सोनाली सुकाळ, संकेत खंडागळे, आदित्य लोखंडे, वैष्णवी साळुंखे, आरोही साळुंखे, श्रीशा काकडे, काळूराम जाधव, सुयश घनवट व हर्षद बोबडे या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट गायन-वादन सादरीकरणाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कवी संमेलनात उपस्थित कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. याच कार्यक्रमात संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिवराज साने सर यांना राज्यस्तरीय “संगीत रत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शिवराज साने यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, आरोग्य जनजागृती, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक विषयांवर लोकगीते, भारुडे व महापुरुषांच्या कार्यावर आधारित गीतांच्या माध्यमातून सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे जिल्हाध्यक्ष तथा पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष सुरेश वाळेकर यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. उमाकांत अदमाने यांनी केले.
