अनिकेत चव्हाण यूथ इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाचा नवा मंच
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
पुणे : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवडी आणि योग्य दिशादर्शन महत्त्वाचे आहे, या उद्देशाने धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक अनिकेत सोपान (काका) चव्हाण यांच्या ‘अनिकेत चव्हाण यूथ इनिशिएटिव्ह’तर्फे धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या संकुलात ‘करिअर डिस्कव्हरी समिट २०२६’ या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना अनिकेत चव्हाण म्हणाले की, “आज अनेक विद्यार्थी आणि पालक करिअरच्या बाबतीत संभ्रमात असतात. पारंपरिक करिअरच्या पलीकडेही अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना दिशा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
कार्यक्रमामध्ये बापूसाहेब गायकवाड, ऋषी हराळ, अनूप कुमार, रमा काळे, रावसाहेब घुगे, विजय नवले अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या बदलत्या संधी, कौशल्यांचे महत्त्व, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा तसेच भविष्यातील रोजगार क्षेत्रांबाबत वास्तवाधारित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले.
अनिकेत चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाबाबत बोलताना, ‘यात्रा शिक्षणविश्वाची’ या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदल आणि वास्तव समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच युवकांना सक्षम, जागरूक आणि स्वावलंबी बनवण्यासाठी भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उपक्रमाचे कौतुक करत अशा मार्गदर्शन कार्यक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असल्याची भावना व्यक्त केली.
