May 25, 2026

स्थायी समितीत सुहास टिंगरे यांची ऐतिहासिक मागणी मान्य; पेशवेकालीन पाणीपुरवठा योजनेच्या जीर्णोद्धाराला हिरवा कंदील

पुणे | प्रतिनिधी

पुण्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या कात्रज ते शनिवारवाडा पेशवेकालीन भूमिगत पाणीपुरवठा योजनेच्या संपूर्ण जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी 14 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत हा ठराव मांडला होता.

पेशव्यांच्या काळात उभारण्यात आलेली ही भूमिगत जलवाहिनी कात्रज तलावातून नैसर्गिक उताराचा वापर करून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहर आणि शनिवारवाडा परिसराला पाणीपुरवठा करत होती. दगडी आणि मातीच्या पाइपद्वारे उभारलेली ही योजना त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य, नगररचना आणि वैज्ञानिक जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना मानली जाते.

सध्या या ऐतिहासिक जलवाहिनीचे अनेक अवशेष दुर्लक्षित अवस्थेत असून काही भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या वारशाचे जतन व्हावे आणि भविष्यातील पिढ्यांना पुण्याचा समृद्ध इतिहास समजावा, यासाठी या योजनेचे पुरातत्व व तांत्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या ठरावानुसार अस्तित्वात असलेल्या भूमिगत पाइपलाईन, हौद आणि जलसाठ्यांचे जतन व पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच या योजनेला “वारसा संवर्धन प्रकल्प” घोषित करून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासदौरे, माहितीफलक आणि वारसा पर्यटन उपक्रम सुरू करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. यासाठी राज्य पुरातत्व विभाग आणि इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असून विशेष निधीची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत सुहास विजय टिंगरे यांनी आणखी एक महत्त्वाचा ठराव मांडला. पुणे महानगरपालिकेच्या थकीत देयकांवरील शास्ती कर दोन टक्क्यांऐवजी एक टक्का आकारण्यात यावा, हा ठरावही समितीने मंजूर केला.

या दोन्ही निर्णयांमुळे पुण्याच्या वारसा संवर्धनास चालना मिळणार असून नागरिकांनाही दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button