March 23, 2026

आयसीएमएआय (ICMAI) चे देशाच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान – रजनीश जैन

पुणे : काही वर्षांपूर्वीपर्यंत कॉस्ट अकाउंटंटचे कार्य हे कंपन्यांचे आर्थिक ऑडिट करणे आणि फायनान्शियल अकाउंटिंगपुरतेच मर्यादित होते. त्यामुळे या कामाला कंपन्यांच्या बॅक ऑफिस स्वरूपाचे स्थान प्राप्त झाले होते. मात्र बदलत्या काळात दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) मुळे या क्षेत्राचा व्याप आणि महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज देशातील लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून देशाच्या आर्थिक उलाढालीत सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांपर्यंतचे योगदान ICMAI मुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक सक्षमीकरणात ICMAI चे मोठे योगदान असून ‘विकसित भारत’ घडवण्यात संस्थेचा महत्त्वाचा वाटा असेल, असे प्रतिपादन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष व चीफ फायनान्शियल ऑफिसर रजनीश जैन यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) यांच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या “RISE इंडिया लीडरशिप समिट” च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ICMAI चे करिअर काऊन्सेलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन, ICMAI चे उपाध्यक्ष नीरज जोशी, माजी अध्यक्ष बी.बी. नायक, CMA चैतन्य मोहरीर (सचिव – ICMAI-WIRC), CMA श्रीकांत इप्पलपल्ली (अध्यक्ष – ICMAI पुणे चॅप्टर) आदी मान्यवर उपस्थित होते.

रजनीश जैन म्हणाले की, ICMAI चे स्वरूप, कार्य आणि जबाबदाऱ्या काळानुसार बदलत आहेत. आज कॉस्ट अकाउंटंट्सचा कंपन्यांच्या प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढला असून ICMAI ही देशाच्या आर्थिक विकासाला सकारात्मक दिशा देणारी संस्था ठरत आहे. उद्योग आणि ICMAI यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास केवळ कंपन्यांचाच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासालाही अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CMA श्रीकांत इप्पलपल्ली म्हणाले की, तंत्रज्ञानासोबतच कंपन्या आणि व्यावसायिकांच्या गरजा वेगाने बदलत आहेत. आज देशात कॉस्ट अकाउंटंट्सची कमतरता जाणवत असून व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदांची अधिक गरज आहे.

CMA विनय रंजन यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताची ओळख पाश्चिमात्य कंपन्यांसाठी बॅक ऑफिस सेवा पुरवणारा देश अशी होती. मात्र आता ही प्रतिमा बदलत असून ICMAI आणि कॉस्ट अकाउंटंट्सचा देशाच्या आर्थिक उलाढालीत सुमारे दोन टक्के वाटा निर्माण झाला आहे. ICMAI मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या उद्दिष्टात संस्थेचा मोलाचा वाटा असेल. देशाची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

बी.बी. नायक म्हणाले की, ICMAI चा मुख्य उद्देश हा व्यवसायवृद्धीसोबतच कंपन्या आणि व्यावसायिकांमध्ये गुणात्मक बदल घडवणे हा आहे. रजनीश जैन यांनी रिलायन्स जिओमध्ये घडवलेले सकारात्मक बदल तरुणांनी आणि कॉस्ट अकाउंटंट्सनी आदर्श म्हणून घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

नीरज जोशी यांनी स्पष्ट केले की, बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात येत असून गुणवत्तापूर्ण कॉस्ट अकाउंटंट्स घडवणे ही काळाची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात तरुणांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन ICMAI नव्या अभ्यासक्रमांची आखणी करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया चौधरी यांनी केले. CMA श्रीकांत इप्पलपल्ली यांनी प्रास्ताविक केले तर CMA चैतन्य मोहरीर यांनी आभार मानले.

उद्घाटनानंतर झालेल्या कॉस्ट अकाउंटिंग विषयक चर्चासत्रात चित्तरंजन चट्टोपाध्याय, राजेश शुक्ला, राजा मुखर्जी, संजय भार्गवे, हिमांशु दवे, अरिंदम दत्ता, एस.के. गुप्ता, पूजा शेळके, रजनीश पांडे, डी.व्ही. जोशी, अजय महाजन, दिनेश कुमार वर्मा, हितेश माहेश्वरी, अवधूत उपाध्ये, मिलिंद जोगळेकर, अमित आपटे आदी मान्यवरांनी “ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मधील धोरणात्मक नेतृत्व : मूल्यनिर्मितीचे शिल्पकार म्हणून CMAs” या विषयावर मार्गदर्शन केले.

या परिषदेच्या माध्यमातून GCCs ची बदलती भूमिका आणि कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CMAs) यांचे वाढते धोरणात्मक योगदान अधोरेखित करण्यात आले. परिषदेत विविध आघाडीच्या GCC कंपन्यांचे प्रतिनिधी, CFOs तसेच HR प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button