पुण्यात क्रीडापटूंना दिलासा मिळणार? 12 वर्षांच्या लढ्यानंतर शाळांची मैदाने पुन्हा खुली होण्याची शक्यता
पुणे : सन 2014 मध्ये पुणे महानगरपालिकेने शाळांच्या मैदानांच्या भाड्यात आकस्मिक वाढ केल्यामुळे शहरातील विविध क्रीडा प्रशिक्षण उपक्रम बंद पडले होते. यामुळे हजारो क्रीडापटूंना नियमित सरावापासून वंचित राहावे लागले होते.

या पार्श्वभूमीवर क्रीडा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्यच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून शाळांची मैदाने पूर्वीप्रमाणे अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने लढा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यंदा यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
यासाठी आज समितीच्या वतीने माननीय महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती अध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी क्रीडा समन्वय समितीचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, उपाध्यक्ष महादेव शिंदे व सोहन परदेशी, सचिव संतोष देवकुळे आणि कोषाध्यक्ष उमेश काची उपस्थित होते.
शहरातील क्रीडापटूंमध्ये या घडामोडीमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच सरावासाठी शाळांची मैदाने पुन्हा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

