May 10, 2026

राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा

पुणे : पाषाण–औंध परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या राजभवन रोड (सद्य: लोकभवन मार्ग) विस्तारीकरण प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, आज या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. आमदार सिद्धार्थ शिरोळे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात झाली.

या मार्गाच्या मधोमध असलेल्या पोलीस विभागाच्या काही हेरिटेज वास्तूंमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. आवश्यक परवानग्या उपलब्ध असूनही विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प प्रलंबित राहिला होता. याबाबत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सातत्याने पाठपुरावा करत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांची भेट घेऊन
अडथळ्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने संबंधित पोलीस इमारतींचे स्थलांतर व हटविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया रावबून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर आज रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राजभवन (लोकभवन) मार्ग हा पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच व्हीआयपींची ये-जा होत असते. त्यामुळे या रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे औंध–पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, ब्रेमेन चौक ते औंध राजीव गांधी पूल दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पालाही या निर्णयामुळे गती मिळणार असून, संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

या वेळी नगरसेवक सनी निम्हण,नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड तसेच हेरिटेज विभागाचे, भवन विभागाचे, पथ व मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button